चला महाराष्ट्र घडवूया!
"काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारीद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा"
- राजा बढे
'दिल्लीचेही तख्त राखणारा, देशगौरवासाठी झिजणारा' अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राने देशाला प्रत्येक क्षेत्रात अतुलनीय नररत्ने दिली आहेत. इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा देशाला गरज पडली तेव्हा तेव्हा महाराष्ट्र धावून आला. 'अशा सामर्थ्यवान महाराष्ट्राची ही ओळख आणि गौरव टिकून रहावा यासाठी इथले मनुष्यबळ वैचारिक, नैतिक, सांस्कृतिकदृष्ट्या प्रबळ असले पाहिजे' हा ध्यास घेऊन ...... रोजी शिवराज पाटील यांनी 'एक घास फाउंडेशन' ची स्थापना केली.
'प्रशासन' - लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक. विधिमंडळाने पारित केलेले कायदे आणि धोरणे अमलात आणण्याचे, देशात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे कार्य प्रशासन त्याच्या विविध शाखांद्वारे करते. देशाच्या प्रगतीत प्रशासनाचे महत्व ओळखून 'एक घास फाउंडेशन' महाराष्ट्रातील गावागावातून बुद्धिमान व सुसंस्कृत प्रशासकीय कर्मचारी तसेच अधिकारी बनवण्याच्या ध्येयाने अनेक उपक्रम राबवत आहे. त्यात प्रामुख्याने इ. पाचवीपासून पुढे एम.पी.एस.सी. / यु. पी. एस. सी., आय. ए. एस., आय. पी. एस. या प्रशासकीय परीक्षांची तयारी, बाल-संस्कार, युवा-संस्कार, कौटुंबिक समुपदेशन हे उपक्रम राबवले जात आहेत.
अतिशय महागड्या शिक्षणपद्धतीमुळे आणि महागड्या कोचिंग क्लासेस मुळे अनेक गरीब मुले-मुली युवा वर्ग बुद्धिमान असूनही प्रशासकीय अधिकारी होण्यापासून वंचित राहतो यासाठी महाराष्ट्रातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये २२ वर्षांपासून अविरतपणे सुरु असलेल्या या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत ३५००+ विनामूल्य व्याख्याने दिली गेली आहेत. ज्याचा लाभ जवळपास ३,५०,००० गरीब, होतकरू व बुद्धिमान विद्यार्थ्यांनी घेतला आहे. यातील जवळपास ४५०हून अधिक विद्यार्थ्यांची प्रशासनातील वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ कर्मचारी / अधिकारी पदांवर निवड झाली आहे.
१५ ऑगस्ट २०२१ रोजी मोशी प्राधिकरण (पुणे) येथून सुरु करण्यात आलेल्या 'चला महाराष्ट्र घडवूया एक घास फाउंडेशन' या क्रांतिकारी शैक्षणिक उपक्रमांना आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, वसई व विरार येथून भरभरून प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमांचे रूपांतर कुशल, बुद्धिमान, सुसंस्कृत पिढी घडवणाऱ्या एका विशाल प्रकल्पात व्हावे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील गावागावांमध्ये आणि शहरातील स्वयंपूर्ण सोसायट्यांमध्ये ५व्या इयत्तेपासून प्रशासकीय स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन केंद्र, बालसंस्कार केंद्र, कौटुंबिक समुपदेशन केंद्र उभे करण्याचे आव्हानात्मक कार्य आम्ही 'एक घास' च्या माध्यमातून करायचा निर्णय घेतला आहे आणि मोशी प्राधिकरण सोसायटी, पुणे इथून त्याची सुरवातदेखील केली आहे.
आमची उद्दिष्टे
-
महाराष्ट्रातून देशाला आगामी काळात नीतिमत्तायुक्त, बुद्धिमान, सुसंस्कृत असणारा व मूल्ये जोपासणारा सेवेतील प्रशासकीय अधिकारी देणे.
-
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, आर्मी, नेव्ही, डीएड सीईटी, बीएड सीईटी, बैंकिंग रेल्वे याबरोबरच स्पर्धा परीक्षा MPSC/UPSC सारख्या परीक्षेचे मोफत शिक्षण देणे.
-
५ वी पासूनच IAS/IPS ची तयारी करवून घेणे.
-
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालसंस्कार व युवा संस्कार वर्ग ऑनलाईन पद्धतीने काही ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने देऊन महाराष्ट्रातील सुसंस्कारित युवा पिढी घडविणे.
-
या शैक्षणिक क्रांतीकारी उपक्रमाद्वारे संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि म. फुले जी यांच्या विचारावर चालणारे विद्यार्थी घडविणे.
-
जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करणे.
आमचे ध्येय
-
'एक घास समाजासाठी' या क्रांतिकारी उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित अनाथाश्रम, वृद्धाश्रम, वंचित, गरीब व निराधार मुलांचे आश्रम यांना दोन वेळचे जेवण, कपडे व उपयुक्त शिक्षण देणे.
-
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या केलेल्या मुलांचे संगोपन, मोफत स्पर्धात्मक शिक्षण, वंचित गरीब निराधार व बुद्धिमान मुलांचे त्यांच्या बुद्धीच्या कुवतीनुसार विनामूल्य मार्गदर्शन देणे.
-
संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आश्रमातील विधवा, अपंग, निराधार, अनाथ, मुली मुले, गरीब, वंचित व बेघर स्त्रिया यांच्यासाठी त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार पूर्णतः सर्व कोर्सेसची मोफत माहिती व स्पर्धा परीक्षेचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने व मोफत त्यांच्याच आश्रमामध्ये देणे.
-
महाराष्ट्रातील मतिमंद, अनाथ मुला-मुलींसाठीच्या आश्रमासाठी विशेष सहायता केंद्र स्थापन करणे. यामध्ये जीवनावश्यक वस्तु किराणा, धान्य, कपडे व औषधे यांचा समाविष्ट असेल.
-
महाराष्ट्रातील अनाथ, बेघर, गरीब, वंचित, निराधार मुले व स्त्रिया यांना जीवन जगण्याची नवी दिशा देणे व चला महाराष्ट्र घडवूया या क्रांतिकारी उपक्रमाद्वारे करिअर संदर्भात मोफत मार्गदर्शन देऊन त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देणे.
-
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम कमी झाले पाहिजेत यासाठी जनजागृती करणे पण जे वृद्धाश्रमांमध्ये आहेत त्यांना त्यांचा शेवट गोड करण्यासाठी वेगवेगळ्या मनोरंजनात्मक व आध्यात्मिक उपक्रमाद्वारे दुःख विसरायला लावणे व त्यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत माफक आनंद देणे हे ध्येय आहे.
-
१०० कुटुंब मिळून एक अनाथ आश्रम दत्तक योजना यामध्ये अनाथ मुलांचे वाढदिवस सर्व परिवाराने साजरे करणे त्यांना शिक्षणासाठी वह्या, पुस्तके देणे त्यांना वर्षातून दोन शालेय गणवेश देणे त्याचबरोबर १०० कुटुंबातील प्रत्येकांच्या वाढदिवशी एका अनाथ मुलां-मुलीच्या शैक्षणिक फी वार्षिक कमीतकमी १५००/- ते २५००/- पर्यंत भरुन आत्मिक आनंद व आशीर्वाद प्राप्त करणे हे ध्येय आहे.